सांगली : शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य करुन उदयनराजे यांच्यावर टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष भिडे गुरूजी यांनी सांगली बंदची हाक दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,’मंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी इस्लामपूरला एका कार्यक्रमासाठी येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात येत असताना भिडे गुरूजी यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. भिडे गुरुजी म्हणाले, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. हे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली. या विरोधात सर्व सांगली जिल्हा 17 जानेवारीला बंद राहणार आहे. संजय राऊतांनी माफी न मागितल्यास सर्व महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल.’ असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी तातडीन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.