वायसीएमच्या डॉक्टरांचे यश : दहा लाख रुग्णांमध्ये एखाद्याच रुग्णात आढळतो असा आजार
तब्बल साडेसहा तास चालली शस्त्रक्रिया : स्नायूंपासून पोटाच्या आत शिरली होती गाठ
पिंपरी – महापालिकेच्या पिंपरी – संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात 26 वर्षीय महिलेच्या पोटातील 3 किलो 425 ग्रॅम वजनाचा दुर्मिळ ट्यूमरची गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यात डॉक्टरांना आज यश आले. चव्हाण रूग्णालयात पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. ट्यूमरची ज्या प्रकारे वाढ झाली होती, ती दहा लाख रुग्णांमध्ये एखाद्याच रुग्णामध्ये आढळते. अतिशय गुंतागुतीची ही शस्त्रक्रिया डॉक्टरांशी यशस्वी रित्या पार पाडली.
तळवडे येथील महिलेला मंगळवारी (दि. 14) चव्हाण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पोटात दुखते, जड वाटते म्हणून त्यांची सोनोग्राफी केली. त्याच्यामध्ये पोटात गाठ आढळली. सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना सिटी स्कॅन करण्यास सांगितले. त्यामध्ये दुर्मिळ असा मोठा डेस्मॉईड ट्यूमर आढळला. हा ट्यूमर पोटांच्या स्नायूपासून पोटाच्या आतमध्ये शिरला होता. गर्भाशयाच्या आणि मुत्राशयाच्या पिशवीला चिकटला होता. हा ट्यूमर काढला नसता तर पोटात आणखी पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे रूग्ण महिलेच्या जीवाला धोका उद्भवू शकला असता. 15 बाय 15 बाय 15 से.मी. आकाराचा हा ट्यूमर काढण्यात आला. त्याचबरोबरीने गर्भाशयाची पिशवी देखील काढावी लागली. सकाळी 9:30 ते दुपारी 4 अशी तब्बल साडेसहा तास ही शस्त्रक्रिया चालली. ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ. संजय पाडळे, शल्य चिकित्सक डॉ. कांचन वायकुळे, डॉ. राहुल निकम यांनी ही शस्त्रक्रिया केली. भुलतज्ज्ञ डॉ. जितेंद्र वाघमारे, डॉ. चैत्राली महाडिक यांनी त्यासाठी भूल दिली होती.
रूग्ण महिलेच्या पोटातून काढण्यात आलेला “डेस्माईड ट्युमर’ हा दुर्मिळ प्रकारचा आहे. दर दहा लाख रूग्णांमागे एका रूग्णामध्ये अशा प्रकारचा ट्यूमर आढळतो. यशवंतराव चव्हाण रूग्णालयात पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी खासगी रूग्णालयांत दोन ते अडीच लाख इतका खर्च होतो. चव्हाण रूग्णालयात मात्र अल्प दरात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
– डॉ. संजय पाडळे, ज्येष्ठ शल्य चिकित्सक.