मुंबई : राज्यात सध्या मराठवाडा आणि विदर्भावर पावसाची वक्रदृष्टी पडल्याचे दिसत आहे. कारण मराठवाडा आणि विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचाच दौरा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांच्या याच दौऱ्यावरून आता भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी पवारांवर टीका केली आहे.
अनिल बोंडे यांनी,“नेहमीप्रमाणे अजित पवारांनी फार उशीर केला. देवेंद्र फडणवीस तातडीने हिंगणघाटला गेले होते, विदर्भात फिरले. कधी नव्हे तितक्या तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळाली असून पंचनामेदेखील झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात इतकाच हाहाकार माजला असता तर अजित पवार तातडीने गेले असते. पण सत्तेत असो किंवा नसो, विदर्भात येताना यांना उशीर होतो,” असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. विदर्भाला मदत मिळण्यात विरोधी पक्षाचाही हातभार लागला तर आनंद असेल असेही ते म्हणाले आहेत.
सामानाच्या कार्यकारी संपादकांकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यांना ‘पालापाचोळा’ म्हटले …याविषयी विचारलं असता ते म्हणाले “आपल्याच पक्षातून गेलेल्या लोकांना बोलताना त्यांनाही दु:ख होत असेल. सगळं शेतच जर पाखरांनी खाल्लं असेल, तर शेतकऱ्याने कितीही कपाळावर हात मारला आणि पालापाचोळा म्हटलं तरी उपयोग नाही”.
माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुनील देशमुख यांनी अमरावतीमधील नांदगांवपेठ येथील औदयोगिक वसाहतीत पीएम-मित्रा योजनेअंतर्गत प्रस्तावित ‘टेक्सटाईल पार्क’ औरंगाबाद येथील ऑरिक सिटी मध्ये पळवण्याचे कारस्थान रचण्यात आले असून हे नवीन सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. त्यावरही अनिल बोंडे यांनी भाष्य केले.