मुंबई – देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आलेल्या आमदारांनी मला शिविगाळ केली. काही जण माझ्यावर तुटून पडले, असे विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. माझ्या निर्णयात काही चुकीचे असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे ते म्हणाले.
मी विरोधकांना बोलू दिले, पण जेव्हा मंत्री बोलणार असतील तेव्हा त्यांनाही बोलू द्या असे फडणवीस यांना सांगितले. प्रस्ताव वाचा मग भाष्य करा. भुजबळांनी प्रस्ताव वाचला आणि त्यांनी एक एक मुद्द्याचे स्पष्टीकरण दिले. मी मगाशी फडणविसांना म्हटलं की आवरा’. त्यावर फडणवीसांना, नाही आवरणार, मी रागावलोय असं उत्तर दिले, असेही भास्कर जाधव यांनी निलंबनाची कारवाई करताना सांगितले.
कदाचित वॉक आऊट करणं हा विरोधकांच्या योजनेचा भाग असेलअसे मला वाटले. सभा त्याग करताना व्यासपीठावर काही सदस्य आले आणि त्यांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला, राजदंड पाळवण्याचा प्रयत्न केला, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
सभागृह तहकूब झाल्यावर मी अध्यक्ष केबिनमध्ये फडणवीस रागावले होते. ते केबिनमध्ये आले. पण ते स्वतः शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. फडणवीसांच्या मागून काही सदस्य माझ्या आई बहिणीवरुन शिव्या देत केबिनमध्ये घुसले होते. काही लोकप्रतिनिधी आमच्या अंगावर तुटून पडले. तुम्ही सर्व असाल तर मी एकटा आहे. मी पाठ दाखवणार नाही असे बोललो, असे जाधव यांनी सांगितले.
सभागृहातील लांच्छनास्पद परिस्थिती का निर्माण करण्यात आली? इतका का राग यायला हवा? मी एकही चुकीचा शब्द चुकीचा बोललो नाही. जर मी चूक केली असेल तर मी पण शिक्षेला तयार आहे. पण आजचा दिवस हा काळा दिवस आहे. माझ्याबाबत हे घडले आहे ते तसेच आज ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात घडलेली गोष्ट निंदनीय आहे. इथून बाहेर गेल्यावर आपण सर्वच मित्र असतो, मी माझा निर्णय दिलाय. आता सरकारने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.