नवी दिल्ली – बॅंक फसवणूक प्रकरणात ईडीने आज शक्तिभोग फुड्स प्रा. लि कंपनीचा प्रमुख केवल कृष्णकुमार याला अटक केली आहे. त्याला 9 जुलैपर्यंत ईडीच्या कस्टडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही अटक करण्यापूर्वी ईडीने त्याच्या नऊ मालमत्तांवर छापेही घातले होते. त्याने दहा बॅंकांच्याकडून एकूण 3269 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
हे कर्ज मिळवण्यासाठी त्याने बोगस कागदपत्रे दाखवून बॅंकांची फसवणूक केल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. ही कंपनी अनेक प्रकारचे अन्न पदार्थ व पीठे विकते.
गेल्या 24 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून कंपनीच्या उत्पादनांचा एक मोठा ब्रॅंड विकसित झाला असून कंपनीची वार्षिक उलाढाल सन 2008 साली 1411 कोटी रुपये इतकी होती ती सन 2014 मध्ये वार्षिक सहा हजार कोटी रुपयांवर गेली आहे. नंतरच्या काळात मात्र कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. त्यानंतरच्या काळात त्याने बॅंकांना खोटी माहिती देऊन मोठ्या प्रमाणात कर्ज मिळवले आणि हे पैसे त्याने अन्य मालमत्तांमध्ये गुंतवले असे तपासात निष्पन्न झाले आहे.