नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे 35 पैशांची वाढ केली. त्यामुळे अवघ्या 2 महिन्यांत पेट्रोलच्या दरात 35 वी वाढ नोंदली गेली. त्या दरवाढींमध्ये मिळून पेट्रोल 9.46 रूपयांनी महागले.
काही दिवसांच्या विश्रामानंतर 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे सत्र सुरू झाले. त्यातील अखेरच्या दोन वेळी सार्वजनिक कंपन्यांनी डिझेलच्या दरात बदल केला नाही. त्यामुळे दोन महिन्यांत डिझेल दरात 33 वेळा वाढ झाली. त्यामध्ये मिळून डिझेल 8.63 रूपयांनी महागले. इंधन दरवाढीच्या सत्रामुळे महाराष्ट्रास 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत पेट्रोल दराने याआधीच शंभरी पार केली आहे.
आता दिल्लीतही (99.86 रूपये) तो टप्पा ओलांडला जाण्याची चिन्हे आहेत. राजस्थान, ओडिशा आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत तर पेट्रोलपाठोपाठ डिझेलच्या दरानेही शतक ठोकले आहे. इंधन दरवाढीविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधकांनी मोदी सरकारवर टीकासत्र सुरू ठेवले आहे.