पुणे – आरोग्य, म्हाडा पेपर फुटीनंतर आता टीईटीचे पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पेपरफुटी प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे आता आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनीच पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे. तुकाराम सुपे यांना कोर्टासमोर आज हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी एमएसईसीचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. गैरप्रकाराचा शोध घेण्यासाठी तुकाराम सुपे यांच्याकालपासून चौकशी करण्यात आल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.