पुणे : वैध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे (Tukaram supe) यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) बुधवारी (दि.६) गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran lohar) आणि सांगलीचे निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे (Vishnu kambale) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘एसीबी’कडून तीन आजी माजी शिक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
‘टीईटी’ परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम नामदेव सुपे (वय ५९, रा. पिंपळे गुरव) यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांच्या (Pune police) सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपे यांनी १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत केलेल्या गैरव्यवहारांचे परीक्षण करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०२१ मध्ये पार पडलेल्या टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात सुपे यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या तपासात सुपे यांच्याकडून दोन कोटी ८७ लाख ९९ हजार ५९० रुपये आणि ७२ लाख रुपये किंमतीचे १४५ तोळे सोने असा एकूण मिळून तीन कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुपे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यावेळी त्यांनी जमवलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्यांच्या नोकरीच्या कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ५ कोटी ८५ लाख रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमवल्याच्या आरोपावरून सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी लोहार यांची पत्नी सुजाता आणि मुलगा निखिल यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहार कुटुंबीयांच्या नावावर असलेली मालमत्ता त्यांनी बेकायदा जमवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. (Pune crime news)
सांगलीचे निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे आणि त्यांची पत्नी जयश्री यांच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे यांच्याकडे सुमारे ८३ लाख रुपये किमतीची मालमत्ता सापडली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.