Eknath Shinde On Rajan Vichare – ठाणे लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत राजन विचारे हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे निवडून यायचा. यामध्ये राजन विचारेंचे कर्तृत्व काय होते? खासदारकीला मोदी साहेबांच्या नावावर तुम्हाला मतं मिळाली, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यावर टीकास्त्र डागले.
एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या काळात राजन विचारे कार्यकर्त्यांना पैसे द्यायचा नाही ना वडापाव खाऊ घालायचा. तरीही मी सांगायचो म्हणून सगळे काम करायचे. आता राजनचा सीझन संपला, नरेशचा विजय आता पक्का आहे.
पण संजय केळकरांची विनंती आहे की, नरेश तुला थोडं बदलावे लागेल, असे शिंदे यांनी म्हटले. ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांनी चिंता करु नका. मला काही जणांना तिकडे पाठवायचे आहे, काहीजणांना इकडे ठेवायचे आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
राजन ठाकरे यांना ठाकरे गटाने ठाण्यातून उमेदवारी दिली आहे. ठाण्यात नरेश म्हस्के यांचा सामना महाविकास आघाडीच्या राजन विचारे यांच्याशी होणार आहे. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडात राजन विचारे यांनी त्यांना साथ दिली नाही. ते उद्धव ठाकरे गटातच राहिले.