त्रिभूज शेळके
पारगाव -पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा ज्वर दौंड तालुक्यात शिगेला पोहोचला आहे. सध्या दौंड तालुक्यात “अ’ गटातील मतदारांची बडदास्त मोठ्या प्रमाणात ठेवली जात आहे. मात्र, ब, क, ड गटांतील मतदार या बडदास्तीपासून दुर्लक्षित झाला आहे. दौंड तालुक्यात जिल्हा बॅंकेच्या आखाड्यात बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार रमेश थोरात यांनी आठव्यांदा रिंगण मारले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील थोरात यांनी बॅंकेची लढत चुरस केली आहे. थंडीची वाढता कडाका आता राजकीय हवा गरम करीत आहे. अ गटातून थोरात यांना संधी दिली, तर वैशाली नागवडे, अशोक खळदकर, वीरधवल जगदाळे हे उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडले.
त्यामुळे दौंड तालुक्यात थोरात आणि भाजपचे अभिमन्यू गिरमकर यांच्यात लढत होत आहे. आमदार राहुल कुल यांनी ही जागा एकाकी सोडली नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये एकसंघपणा टिकवून ठेवला आहे. त्यामुळे दौंडमधील चुरस आणखी वाढली आहे.
निवडणुकीची हवा दौंडमध्ये तापली आहे. कार्यकर्त्यांमध्ये ऐन थंडीत गरमी भरली आहे. निवडणुकीला रंग चढू लागला आहे.”अ’ वर्ग मतदारसंघातील काही प्रतिष्ठेच्या जागा बिनविरोध करण्यात त्या त्या नेत्यांना यश आले आहे. इतर ठिकाणी मात्र उमेदवारांचा कस लागलेला दिसत आहे. “अ’ वर्ग मतदारांना खुश व संपर्कात ठेवण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. त्यांना मान- सन्मान देण्यात येत आहे.
त्यांना एकत्र बोलवून एखाद्या फार्म हाऊस किंवा कार्यकर्त्यांच्या बंगल्यावर मटण,बिर्याणीची मेजवानी दिली जात आहे. नुकतीच उरुळी येथील एका फार्म हाऊसवर “अ’ वर्ग मतदारांना मेजवानी देण्यात आली आहे.
एकंदरीत मतदारांची “अ’ वर्ग श्रेणीचीच बडदास्त होत आहे. मात्रल “ब’ “क’ “ड’ गटातील मतदार बडदास्तीपासून दुर्लक्षित राहिल्याचे चित्र दिसत आहे. काही मतदारांनी याची खंत व्यक्त केली आहे. एकंदरीत “अ’ गटातील मतदारांना ही निवडणूक पर्वणी ठरली आहे.
सोसायटीचे कारभारी तुपात
दौंड तालुक्यात “अ’ गटात 121 मतदार आहेत. ब गटात आठ, क गटात 57 तर ड गटात 80 मतदार आहेत. मात्र, इतर गटांतील मतदार सोडून राष्ट्रवादी आणि भाजपचे तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी अ गटावरच भिस्त ठेवली आहे. थोरात यांच्या ताब्यात या गटातील सोसायट्या लक्षणीय आहेत.
तसेच आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात सहकारी सोसायट्या आहेत. बलाबल पाहता थोरात यांचे पारडे जड राहणार की कुलांचे होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. थोरात यांच्या लढतीमुळे दौंड तालुक्यात चुरस निर्माण झाली आहे.