पुणे :- भारत २०३६ चे यजमानपद भूषविण्याच्यादृष्टीने पूर्वतयारी करत असून राज्यानेही प्रत्येक क्रीडा प्रकारातील आपली बलस्थाने आणि कमकुवत दुवे ओळखून या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे (दि.२८)आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
राज्यपाल बैस म्हणाले, ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. क्रीडातज्ज्ञ आणि खेळाडूंच्या सहकार्याने आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजना तयारी करण्यात यावी. शालेय स्तरावरील विविध स्पर्धांच्या आयोजनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावरही भर द्यावा लागेल.
महाराष्ट्र हे क्रीडा धोरण बनविणारे पहिले राज्य आहे. आजही देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात राज्याचा दबदबा आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम सामुहिक कामगिरीसाठी अधिक तयारी करण्याची गरज आहे. विशेषत: स्थानिक खेळांकडेही लक्ष द्यावे लागेल, असे सांगतानाच राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.
समर्पित प्रशिक्षक आणि निवृत्त खेळाडू ही आपली खरी शक्ती आहे. खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी त्यांचे सहकार्य आणि पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग करून घ्यायला हवा. ‘मिशन लक्ष्यवेध’च्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खेळाडूंची महत्वाकांक्षा, निष्ठा आणि संकल्प त्यांना अडचणीतून मार्ग काढत यशाला गवसणी घालण्यात मदत करेल, असेही राज्यपाल बैस म्हणाले.
राज्यपाल महोदयांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. एकूण ११९ खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीकांत शरदचंद्र वाड यांना सन २०१९-२० या वर्षाचा तर दिलीप बळवंत वेंगसरकर यांना सन २०२०-२१ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.