फुलगाव:- माती गटात विजयी सलामी देणारा पृथ्वीराज मोहोळ.
फुलगाव – महाराष्ट्राच्या मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये खेळावे असे आमचे स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरविण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आखाड्यात झुंज द्या, तुम्हाला काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिले. मंगळवारी सुरु झालेल्या या स्पर्धेत माती गटात अनिकेत मांगडे व पृथ्वीराज मोहोळ यांनी विजयी सलामी दिली.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पै.विलास कथुरे, ऑलिम्पियन पै. नरसिंग यादव, हिंदकेसरी पै.योगेश दोडके, भारत केसरी पै.विजय गावडे, आशियाई सुवर्ण विजेते पै. रविंद्र पाटील, महाराष्ट्र केसरी बापुसाहेब लोखंडे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस, मुंबई महापौर केसरी आबा काळे, उपमहाराष्ट्र केसरी – रवींद्र पाटील यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी गटात झालेल्या माती विभागातील पहिल्या लढतीत यजमान पुणे शहरच्या अनिकेत मांगडेने अमरावतीच्या तानाजी झुंजुरकेचे तगडे आव्हान 12-10 असे परतवून लावत शानदार सलामी दिली. केसरी गटात गोंदियाच्या वेताळ शेळकेने सोलापूरच्या विशाल बनकरला पुढे चाल दिली. नाव आणि वजन देऊनही वेताळने मातीच्या आखाड्यावर उपस्थिती लावली नाही. अन्य लढतीत पृथ्वीराजने भारंदाज डावाचा मुक्त वापर करत शुभम जाधवला तांत्रिक आघाडीवर 10-0 असे पराभूत केले.