खेड तालुक्यात काम सुरू : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणार
राजगुरूनगर – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम खेड तालुक्यात सुरू झाली आहे. त्यासाठी तालुक्यातील तलाठी मंडल अधिकारी आणि मोडी लिपी अभ्यासक, अभिलेख कक्षाचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने नोंदीचा शोध घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तात्काळ सादर करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी दिली.
मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे मोठे आंदोलन झाले त्यानंतर कुणबी मराठा वाद पुढे आला. मराठा आणि कुणबी हा वाद राज्य सरकारमध्ये पेटला आहे. राज्य सरकारचे महसूल विभाग कामाला लागले आहेत. पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम सुरु झाली असून मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम करीत आहे . खेड तालुक्यातील 192 महसुली गावातील जुन्या मराठा कुणबी नोंदणी शोधण्यात येणार आहेत. महसूल विभागाचे सर्व रेकॉर्ड एकत्र करून ते शहरातील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलाच्या सभागृहात नेण्यात आले असून तेथे या नोंदी चा शोध घेतला जात आहे.
या नोंदी शोधण्यासाठी मंडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तलाठी, अभिलेख कक्ष कर्मचारी आणि तालुक्यातील मोडी लिपी अभ्यासक यांच्या माध्यमातून या नोंदी तीन दिवस शोधण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त सुमोटो पुरावे काढून त्याचचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. जेणेकरून पुढे जातीचे दाखले देण्यासाठी सूपभ प्रक्रिया होईल. खेड तालुक्यात 1871 पासूनचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. मोडी वाचकांकडून उपलब्ध मराठा कुणबी, कुणबी मराठा रेकॉर्डचे स्कॅनकरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांचा अहवाल सादर केला जाणार आहे. खेड तालुक्यात 90 टक्क्यांपेक्षा अधिक नोंदी आढळून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खासरा पत्रक, पाहणीपत्रक, क पत्रक, कुळ नोंदवही, नमुना 1 हक्क नोंद पत्रक, नमुना 2 हक्क नोंद पत्रक, सातबारा उतारा जन्म मृत्यू नोंदी रजिस्टर गाव नमुना 14 यातील मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी शोधण्यात येत आहेत.
तीन दिवसांत हे काम पूर्ण होणार
खेड तालुक्यात जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार यांच्या आदेशाने खेड तालुक्यातील 1971मध्यील सर्व रेकॉर्ड एकत्र करून त्यातील मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा नोंदीचा शोध घेतला जात आहे तलाठी, मंडल अधिकारी मोडी अभ्यासक यांच्या मदतीने या नोंदी शोधल्या जात आहेत. तीन दिवसात हे काम पूर्ण होईल. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी दिली.