पाथर्डी,(प्रतिनिधी) – दिव्यांगांच्या विशेष ऑलिंपिक स्पर्धेत पाथर्डीच्या नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान,सांस्कृतिक मंडळ संचलित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह व निवासी मतिमंद विद्यालयातील मुलांनी दहा पदकांची कमाई करून घवघवीत यश संपादन केले. स्पेशल ऑलिंपिक भारत संस्थेच्या नागपूर विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजन करण्यात आली होती. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मेधा सोमय्या, नागपूर विद्यापीठाचे प्रा.कुलगुरू डॉ.संजय दुधे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शरद सूर्यवंशी, मोहन मते, स्पेशल ऑलिंपिकचे क्षेत्रसंचालक डी.जी. चौधरी, डॉ.भगवान तलवारे,आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू प्रतीक मोपकर आदी उपस्थित होते.
या ऑलिंपिक स्पर्धेत पाथर्डीच्या अनाथ मतिमंद विद्यालयातील एकूण ७ मुलांनी सहभाग नोंदवून ५ सुवर्ण ,३ रौप्य व २ कांस्य अशा एकूण १० पदक मिळवण्याचा मान पटकावला आहे. ‘बाबू’ या मुलाने जलतरण (पोहणे) २५ व ५० मीटर मध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवून २ सुवर्णपदके मिळवली.
जयसिंग नारायण यादव या विद्यार्थ्याने २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून १ सुवर्णपदक पटकावले. दीपक कांतीलाल पावरा याने १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून १ सुवर्णपदक मिळवले. लांब उडी या क्रीडा प्रकारांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून १ रौप्य पदक पटकावले.
कृष्णाने गोळाफेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक तर १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळवून १ सुवर्ण, १ कांस्य पदक पटकावले. रज्जाक गोचू या विद्यार्थ्याने २०० मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळवून १ कांस्यपदक मिळवले. निवासी मतिमंद विद्यालयातील दीपक डमाळे या विद्यार्थ्याने २५ मीटर पोहणे यात द्वितीय क्रमांक मिळवून १ रौप्य पदक मिळवले. वैभव जाधव या विद्यार्थ्याने २०० मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून १ रौप्य पदक पटकावले.
धावणे, बास्केटबॉल, फुटबॉल, हँडबॉल, स्केटिंग, टेबल टेनिस, स्विमिंग, पाॅवरलिफ्टिंग, व्हॉलीबॉल, रोलर स्केटिंग, भालाफेक, गोळाफेक, स्पॉटजम्प इ. क्रीडा प्रकारात राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ६०० दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्षा अनिता निऱ्हाळी, सचिव सुशिला तरवडे, मुख्याध्यापक सचिन तरवडे, व्यवस्थापक प्रताप निऱ्हाळी यांनी विजेता खेळाडूंचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक आदिनाथ शिरसाट, क्रीडा शिक्षक दत्तात्रय कोलते ,नितेश मेघनर, गौरव खताळ, रमेश माने, दिनेश गरड, संभाजी झावरे, बापूसाहेब गायकवाड, अशोक जेधे या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.