पुणे – वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा खराडी, पुणे येथे पहिल्या दिवशी फ्रीस्टाईलच्या १० वजनगटातील कुस्ती स्पर्धा झाल्या. महाराष्ट्राच्या पै. पृथ्वीराज मोहोळ याने १२५ कीलो वजन गटामध्ये तर ६५ कीलो वजन गटामध्ये सोनबा गोंगाणे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले . १६५ गुणांकासह दिल्ली संघाने जनरल चॅम्पियनशिप जिंकली तर १४० गुणांसह महाराष्ट्र तिस-ता क्रमांकावर राहीला.
स्पर्धेचे उदघाटन भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी माजी आमदार बापुसाहेब पठारे, पंढरीनाथ पठारे , पै. योगेश दोडके , पै. संदीप भोंडवे , स्पर्धा प्रमुख व्ही एन प्रसाद उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत स्पर्धा आयोजक जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले व आभार प्रदर्शन स्पर्धा आयोजक सुरेंद्र पठारे यांनी केले.
आपल्या स्वागतपर भाषणात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्रात २३ वर्षांनी सिनियर नॅशनल स्पर्धा होत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील कुस्तीगीर भविष्यात नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतील असा विश्वास दाखवला. उद्या ३१ जानेवारी रोजी महीला विभागातील स्पर्धा होणार आहे