आंबेठाण -महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथून गुरुवारी (दि. 14) दुपारी तीन वाजता 1500 जणांना 65 पीएमपीद्वारे पुणे रेल्वे स्टेशवर सोडण्यात आल्यानंतर रात्री आठ वाजता विशेष श्रमिक रेल्वेद्वारे ते मध्यप्रदेशकडे रवाना झाले. दरम्यान, महाळुंगे इंगळे येथून निघताना या मजुरांनी राज्य शासन व स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.
लॉकडाऊन असल्यापासून हे सर्व मजूर अडकून पडले होते. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही त्यामुळे त्यांना गावाला जायची ओढ लागली होती; परंतु जाण्यासाठी कुठला मार्ग नव्हता त्यामुळे काही लोकांनी आपले कुटुंब घेऊन पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तुमच्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली जात असल्याचे आश्वास देत त्यांना थांबविले होते. त्यानुसार गुरुवारी गावात 65 पीएमपी आल्यावर प्रथम या बसेस सेनिटायिझ करण्यात आल्या त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत त्यांना बसमध्ये बसवण्यात आले.
यावेळी त्यांच्यासाठी पाणी, नाष्ट्याची सोय केली होती. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या उपायुक्ता स्मिता पाटील, खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्याचे बालाजी सोनटक्के, तलाठी श्याम वालेकर यांच्या उपस्थितीत व मोठ्या पोलीस बंदोबस्तात सर्वांना पुणे रेल्वे स्टेशनकडे रवाना करण्यात आले. महाळुंगे इंगळेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, प्रवीण संपांगे, सारंग चव्हाण, उपनिरीक्षक विजय सपकाळ यांच्यासह गावातील पोलीस पाटील, तरुण स्वयंसेवक यांनी याकामी मोलाची मदत केली.