पाटणा – अखेर बऱ्याच दिवसांच्या चर्चेच्या फेऱ्यानंतर बिहार मधील महागठबंधनचे जागा वाटप जाहीर करण्यात आले आहे. या राज्यात लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यातील २६ जागा आरजेडी हा पक्ष लढवणार आहे, कॉंग्रेसच्या वाट्याला नऊ जागा आणि डाव्या आघाडीच्या वाट्याला पाच जागा आल्या आहेत. (Lok Sabha Election 2024 Mahagathbandhan announces Lok Sabha seat-sharing for Bihar)
हे जागा वाटप जाहीर झाले असले तरी कॉंग्रेसच्या दिग्गजांना त्यातून फटका बसला आहे. पुर्णिया मतदार संघातून कॉंग्रेस तर्फे पप्पु यादव उत्सुक होते. पण हा मतदार संघ आरजेडीच्या वाट्याला गेला आहे. पप्पु यादव यांनी आपला पक्ष नुकताच कॉंग्रेसमधे विलीन केला आहे.
त्यांनी पुर्णिया हा मतदार संघ सोडण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे आता ते काय निर्णय घेणार हे औत्स्युक्याचे ठरले आहे. तसेच कॉंग्रेसचे फायर ब्रँड युवा नेते कन्हय्याकुमार यांचा बेगुसराई हा मतदार संघ कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे त्यांचाही पत्ता कट झाला आहे.