देवस्थान ट्रस्टची माहिती ; चार दिवस विविध कार्यक्रम
रांजणगाव गणपती – भाद्रपद गणेश उत्सवानिमित्त अष्टविनायकांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र गणपती येथील महागणपती द्वार यात्रेचा शुभारंभ रविवार (दि.28) पासून होत आहे. दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास मंदिर मुक्तद्वार दर्शनास भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिली.
मागील दोन वर्ष करोना काळात यात्रा बंद असल्यामुळे यावर्षी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी केले. रविवार ते बुधवारपर्यंत पहाटेपासून सायंकाळपर्यंत भाविकांना गणपतीच्या मूर्तीला प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. भाद्रपद गणेशोत्सव यंदा 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरा होणार आहे.
कार्यक्रमांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यादरम्यान भाविकांना रविवार ते बुधवारपर्यंत श्री महागणपतीच्या मूर्तीला प्रत्यक्ष हाताने स्पर्श करून दर्शन घेण्याची संधी मिळणार असल्याचे विश्वस्त नारायण पाचुंदकर यांनी सांगितले. प्रथेनुसार भाद्रपद गणेश उत्सवात श्री महागणपतीच्या चारही दिशांना असलेल्या बहीणींना आणण्यासाठी पालखीद्वारे द्वारयाञा काढली जाणार असल्याचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे यांनी सांगितले.
यात्राकाळात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांना सुविधा दिली आहे. दरम्यान, भाविकांना मंडप व्यवस्था, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची सुविधा, हिरकणी कक्ष आदी सुविधा दिल्या आहेत. शिरूरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ व पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, ग्रामस्थ व विश्वस्त मंडळासमवेत झालेल्या बैठकीमध्ये भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक मांडगे यांनी मंदिर परिसराची पाहणी करून रांजणगाव देवस्थानचे विश्वस्तांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे, महावितरणचे सहायक अभियंता डी. पी. पाचुंदकर, अग्निशमन अधिकारी पी. व्ही. गुंड, ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख, सरपंच सर्जेराव खेडकर, शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर-पाटील, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर-पाटील, दत्तात्रय पाचुंदकर-पाटील, देवस्थानचे माजी अध्यक्ष दत्तोबा लांडे, बबनराव कुटे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ऍड. विजयराज दरेकर, प्रा. नारायण पाचुंदकर, सचिव डॉ. संतोष दुंडे, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, नामदेव पाचुंदकर-पाटील, हर्षल जाधव, आकाश बत्ते, आण्णा शेळके, बाळासाहेब संदीपस्त उपस्थित होते.