प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 – एरिस बायोएनर्जी बायोडीझेल ओडिसी 2022 या आंतरराष्ट्रीय मोहिमेवर असलेल्या प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ अविनाश नारायणस्वामी यांनी अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) कार्यालयाला भेट दिली.
याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, प्रकल्प अधिकारी मंगेश क्षीरसागर, सत्या नटराजन, शिवम सिंग आणि सदस्यांच्या हस्ते अविनाश नारायणस्वामी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एरिस बायोएनर्जीचे रिजनल कॉर्पोरेट हेड मुशीर उलदे उपस्थित होते.
“एपीसीसीआय’च्या वतीने कृष्णन कोमांडूर यांनी या मोहिमेचे पुण्यात स्वागत केले. तसेच एपीसीसीआयचे कार्य आणि विविध उपक्रमांबाबत उपस्थितांना माहिती दिली. नारायणस्वामी हे प्रॉडक्ट डिझायनर आकांकाश यांच्यासोबत भारतीय बनावटीच्या बायोडीझेल कारमधून या मोहिमेदरम्यान तीन देशांतील (भारत, नेपाळ आणि भूतान), 25 शहरे आणि 30 दिवसांमध्ये 10 हजार किमीचा प्रवास करणार आहेत. या मोहिमेला एरिस बायोएनर्जी, कॉमटेल नेटवर्क्स आणि वेंटीएंट एनर्जी यांनी पाठिंबा दिला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण,शाश्वत जीवनशैलीबाबत संकल्पनांचे महत्त्व यावर भर देण्यात येणार आहे. ही मोहीम पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि पुढील पिढीसाठी एक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने युवकांना प्रोत्साहित करणार आहे.