Rajendra Shukla : मध्य प्रदेशचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला जखमी झाले आहेत. समर्थकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत राजेंद्र शुक्लाही जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्साही समर्थकांचा जमाव राजेंद्र शुक्ला यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी घरी पोहचला होता. तेव्हा अचानक झालेल्या या धक्काबुक्कीत शुक्ला यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली. सध्या त्यांना प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले.
त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. मोहन यादव यांच्याशिवाय राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय भाजपने नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतला आहे. भोपाळमध्ये हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नेड्डा उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar) यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह अनेक भाजप नेते उपस्थित होते.
कोण आहेत राजेंद्र शुक्ला ?
राजेंद्र शुक्ला हे इंजिनिअर आहेत आणि ते रेवा येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1964 साली झाला. राजेंद्र शुक्ला यांनी स्टुडंट युनियनमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1986 मध्ये ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते आणि 1998 मध्ये त्यांनी रीवा येथून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर राजेंद्र शुक्ला यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.