पुणे – छोट्या लोकांची मोठी बॅंक म्हणून सहकारी बॅंकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या जनता सहकारी बॅंक, पुणेच्या अध्यक्षपदी माधव ऊर्फ अभय रामकृष्ण माटे यांची तर उपाध्यक्षपदी अलका विजय पेटकर यांची 9 ऑक्टोबर रोजी एकमताने निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष संजय लेले यांच्याकडून माटे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ही माहिती जनता बॅंकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष माधव ऊर्फ अभय माटे हे सनदी लेखापाल (सी.ए.) असून त्यांना बॅंकिंग आणि आर्थिक क्षेत्राचा गाढा अनुभव आहे. यापूर्वी माटे यांच्यावर जनता बॅंकेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अलका विजय पेटकर यांना बॅंकिंग क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव असून त्यांनी यापूर्वी बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांवर काम केले आहे.
जनता सहकारी बॅंक, पुणेच्या गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यात मिळून 71 शाखा कार्यरत असून बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये मोबाइल बॅंकिंग, इंटरनेट बॅंकिंग, एनिव्हेअर बॅंकिंग, ऑनलाइन बिल पेमेंट, एनईएफटी/आरटीजीएस, विमा आणि म्युच्युअल फंड या आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध आहेत. सप्टेंबरअखेर बॅंकेचा एकूण व्यवसाय 14 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.