बंगळूर – भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यरत असणारा एक तरूण शास्त्रज्ञ पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. कर्नाटकच्या म्हैसूरमधून अचानकपणे बेपत्ता झालेल्या त्या शास्त्रज्ञाचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अभिषेक रेड्डी गुल्ला (वय 26) असे नॉट-रिचेबल झालेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असणारे अभिषेक वर्षभरापूर्वी म्हैसूरमधील भाभा अणुसंशोधन केंद्रात रूजू झाले. राहण्यासाठी त्यांनी एक खोली घेतली. तिथून ते 6 ऑक्टोबरला दुपारी दुचाकीवरून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटूंबीयांनी त्यांच्या कार्यालयात चौकशी केली. त्यानंतर ते बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली.
त्याबाबतची तक्रार स्थानिक पोलिसांत नोंदवण्यात आली. अभिषेक नैराश्यग्रस्त बनल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ते 17 सप्टेंबरपासून कामावर गैरहजर होते. त्यांच्याशी 5 ऑक्टोबरला कार्यालयातून संपर्क साधला गेला.
त्यावेळी पुढच्या दिवसापासून कामावर हजर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ते कार्यालयात गेलेच नाहीत. अभिषेक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी मित्रांनी आणि कुटूंबीयांनी सोशल मीडियावरून मोहीम हाती घेतली आहे.