पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालयांसाठी खरेदी केलेल्या हाय वॅक्युम सक्शन मशीन खरेदीत प्रचंड गडबड घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप थेट चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला असून पुरवठादार ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच वैद्यकीय विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांना आमदार जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालयांसाठी 20 हाय वॅक्युम सक्शन मशीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यानंतर मे. सेबर्ड सिस्टम्स आयएनसी या पुरवठादार ठेकेदाराला कामाचा आदेश दिला. त्यानुसार संबंधित पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला मशीन पुरवल्या. निविदा प्रक्रियेमध्ये निश्चित केलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून या पुरवठादार ठेकेदाराला संबंधित अधिकाऱ्यांनी पात्र केले आहे.
निविदेत मशीनमध्ये कोणत्या टेक्निकल स्पेशिफिकेशन असावेत, हे नमूद आहे. त्यानुसार पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला मशीन देणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रत्यक्षात पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला दिलेल्या मशीन निविदेत नमूद टेक्निकल स्पेशिफिकेशनच्या नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे निविदेत एका मशीनची किंमत सुमारे 6 लाख 80 हजार नमूद असून, सरकारच्या जीईएम पोर्टलवर याच मशीनची किंमत 3 ते 4 लाखांच्या घरात आहे.
14 हून अधिक टेक्निकल स्पेसीफीकेशन नाहीत
मशीनमध्ये निविदेत नमूद तब्बल 14 हून अधिक टेक्निकल स्पेसिफिकेशन नसल्याची बाब समोर आली आहे. तरीही, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे मे. सेवर्ड सिस्टम्स आयएनसी या ठेकेदाराकडून त्रुटीयुक्त वॅक्युम सक्शन मशीन घेतले आहेत. ही निविदा तत्काळ रद्द करून अटी व शर्तींचे भंग करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. त्यांनी पुरवलेल्या मशीन न घेता त्याचे पैसे अदा केले गेले असल्यास ते वसूल करावेत. त्याचप्रमाणे गडबड घोटाळा करण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया राबवून चुकीच्या टेक्निकल स्पेसिफिकेशनचे मशीन दाखल करून घेणाऱ्या वैद्यकीय विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.