योगेश कणसे
लोणी देवकर : इंदापूर तालुक्यात नीरा आणि भीमा या नद्यांमुळे बागायत क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. कृषी उत्पादनात इंदापूर तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. यामध्ये अग्रस्थानी ऊस, द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि कांदा आदी पिकांसह केळीच्या उत्पादनातही जिल्ह्यात अग्रस्थानी असलेला तालुका म्हणून इंदापूरची ओळख आहे.
शेती विषयी सरकारची नवीन धोरणे, यामुळे शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नाही. शेतकरी शेतीला पर्यायी जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाकडे वळले; मात्र सध्या दूध व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असून दुष्काळी परिस्थिती दुधाला 18 ते 20 रुपये असा नीचांकी दर मिळत असून, अनुदानही रखडले आहे.
अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेली महागाई आणि कमी होत चाललेले दुधाचे दर यामुळे दूध उत्पादक चिंतेत आहे. या वर्षात बाजारभावात झालेली घट आणि दूध उत्पादनासाठीचा प्रतिलीटर 30 रुपये खर्च येतो. त्यातच दुष्काळजन्य परिस्थितीत वाढलेल्या पशुधनाच्या किमती आणि हिरव्या चाऱ्याचा तुटवडा जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
बाजारात सर्व सामान्यांना दूध 40 रुपये लिटरच्या पुढे मिळते; परंतु तेच दूध शेतकऱ्यांकडून 20 रुपये दराने घेऊन विकताना खासगी दूधसंघ मोठे तर दूध उत्पादक गरीबच राहिला. यामध्ये दूध संघाचे मालक कोट्यधीश झाले.