मेरठ – जेव्हा भारत ही जगातील अकरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, तेव्हा देशातील गरिबीचे प्रमाण वाढत होते. जेव्हा भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला तेव्हा २५ कोटींहून अधिक लोकांना यशस्वीरित्या गरिबीतून बाहेर काढण्यात आले.
आता जेव्हा आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू तेव्हा केवळ गरिबीच नाहीशी होणार नाही तर ‘नवा मध्यमवर्ग’ भारताच्या विकासाला चालना देईल. तसेच बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील मेरठमधून भाजपच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना मोदी बोलत होते. मेरठमधून रामायण मालिकेत श्रीरामाची भूमिका केलेले अभिनेते अरुण गोविल भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत.
यावेळी व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरीही उपस्थित होते. नरेंद्र मोदी म्हणाले, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनताच भारतातून गरिबीही दूर होईल. आता जगावर राज्य करण्याची भारताची वेळ आली आहे. 2024ची निवडणूक ही विकसित भारत घडवण्यासाठी आहे.
या मेरठच्या भूमीशी माझे वेगळे नाते आहे. तुम्हाला आठवत असेल की २०१४ आणि २०१९ मध्ये मी माझ्या निवडणूक प्रचाराची सुरुवात मेरठमधून केली होती. आता २०२४च्या निवडणुकीची पहिली रॅली मेरठमध्येच होत असल्याचे त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचा-यांची गय नाही
देशाला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचवण्यासाठी मी मोठी लढाई लढत आहे. त्यामुळेच आज मोठे भ्रष्टाचारी तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयातूनही त्यांना जामीन मिळत नाही. भ्रष्टाचाऱ्यांनो, कान देऊन ऐका, तुम्ही मोदींवर कितीही हल्ले केलेत तरी हा मोदी आहे, तो थांबणार नाही.
भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच. या देशात जो कोणी लुटमार करेल, त्याला ते परत करावे लागेल. ही मोदींची गॅरंटी आहे, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.