नवी दिल्ली – केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे माता अन्नपुर्णेची मुर्ती उत्तर प्रदेश सरकारकडे आज सुपुर्त करण्यात आली. ही मुर्ती अलीकडेच कॅनडातून परत आणण्यात आली होती. काशी विश्वनाथाच्या मंदिरात त्या मुर्तीची प्रतिष्ठापना 15 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.
येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी, महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आदी उपस्थित होते. सुमारे 100 वर्षापुर्वी चोरीला गेलेली ही मुर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नामुळे भारताला परत मिळाली आहे, असे रेड्डी यांनी यावेळी सांगितले.
भारतीय पुरातत्वा विभागाला या मुर्तीचा ताबा 15 ऑक्टोबरला मिळाला होता. वाराणसीतील या मुर्तीच्या मुळ स्थानाकडे त्याचा प्रवास सुरू झाला आहे. ही मुर्ती दिल्लीहून अलीगढला आज नेण्यात आली. तेथून कनोजला उद्या (दि.12) नेण्यात येणार असून तेथून दि. 14ला आयोध्येत नेण्यात येणार आहे. दि. 15 ला वाराणसी आणून तिची काशी विश्वनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये या मुर्तीला परत आणण्याच्या गोष्टीचा उल्लेख केला होता. वाराणसीतून 100वर्षापुर्वी ही मुर्ती चोरीला गेली होती. 1913च्या सुमारास या मुर्तीची चोरी झाली होती. माता अन्नपुर्णेचे काशीशी विशेष नाते आहे. या मुर्तीचे परत आणणे आमच्या साठी विशेष बाब आहे. माता अन्नपुर्णेची मुर्ती हा आमचा वारसा आहे. पण तो आंतरराष्ट्रीय टोळीची शिकार बनली होती, असे ते म्हणाले होते.
अन्नदेवता असणाऱ्या अन्नपुर्णेची ही मुर्ती अठराव्या शतकातील होती. ती बनारसी पध्दतीने बनवण्यात आली होती. कॅनडातील रेगिना विद्यापीटाच्या संग्रहालयात तिला ठेवण्यात आले होते. या संग्रहालयात विन्निपेग येथील कलाकार दिव्या मेहरा यांना प्रदर्शन भरवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या मुर्तीची माहिती घेण्याचा अभ्यास सुरू केला. त्यावेळी वकील नॉर्मन मॅकेन्जी यांनी 1936 यांनी ही मुर्ती संग्रहालयास दिल्याचे समजले.
एका हातात भाताचा बाऊल घेऊन भगवान विष्णूला नैवैद्य दाखवत असल्याचे हे चित्र पाहून महिला म्हणून त्यांची उत्सुकता जागृत झाली. त्यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांना ही मुर्ती 1913 मध्ये मंदिरातून चोरीला गेल्याचे आणि ती मॅकेन्झी यांना मिळाल्याची माहिती मिळाली.
अमेरिकेतील पिबोडी इक्सेस संग्रहालयातील भारतीय आणि दक्षिण आशियायी कला दालनाचे प्रमुख सिध्दार्थ शहा यांना या मुर्तीची पाहणी केली. त्यांनी ही मुर्ती वाराणसीतील देवता असल्याचे सांगितले. मेहरा यांनी केलेल्या संशोधनात मॅकेन्झी भारतात 1913 ला आले होते. त्यावेळी त्यांनी ही मुर्ती पाहिली. त्यांनी ही मुर्ती आपल्याकडे असावी असे वाटल्याने त्यांनी ही पाषाणातील मुर्ती देवालयातून चोरली. मेहरा यांनी मॅकेन्झी आर्ट गॅलरीचे मुख्य कार्यकारी जॉन हॅम्पटन यांच्याशी संपर्क साधून ही मुर्ती परत देण्याची विनंती केली. ती गॅलरीने मान्य केली. ओटावा येथील भारतीय दुतावास आणि कॅनडाच्या वारसा विभागाने या परत पाठवणीच्या कामात पुढाकार घेतला.
या मुर्तीच्या परत पाठवण्याचा सोहळा नोव्हेंबर 2019मध्ये दृकश्राव्य माध्यमाद्वारे झाला. ही मुर्ती डिसेंबर 2020मध्ये येणे अपेक्षित होते. मात्र करोनामुळे त्यास उशीर झाला. त्याच्या मुळ कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर या मुर्तीचे स्थान भारतीय पुरातत्व खात्याने शोधले. त्यांच्यावरच ही मुर्ती विश्वस्तांकडे सोपवण्याची जबाबादारी होती.