UP Lok Sabha Election 2024 – नुकतेच तुरूंगातून सुटका झालेले आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह (Sanjay Singh) आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करताना संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशात अखिलेश यांच्या पक्षाला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली.
ते म्हणाले की अत्यंत संकटाचा काळ सुरू आहे. दिल्लीच्या प्रमुखांना तुरूंगात टाकण्यात आले आहे. राजधानीतही त्यांनी ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. मात्र आमचे कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे काम करतील. उत्तर प्रदेशात आम्ही कोणती जागा मागितली नसून आम्ही केवळ लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना साथ देत आहोत. हा पाठिंबा बिनशर्त आहे व त्यासाठी कोणतीही अट घालण्यात आलेली नाही.
भाजपला लक्ष्य करताना संजय सिंह म्हणाले की त्यांना मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नको आहे, मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा आहे. भाजपने नैतिकतेच्या गप्पा आता करूच नये. देशातील मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांना ते निवड करून आपल्या पक्षात दाखल करून घेत आहेत. दिल्लीत जे झाले त्यावेळी अखिलेश यादव आमच्यासोबत उभे होते. त्यांनी जी साथ दिली त्याकरता त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे आम्ही आभार मानतो.
ते पुढे म्हणाले की उत्तर प्रदेशात आम्ही निवडणूक लढवत नसलो तरी आमचे कार्यकर्ते इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करतील. ही निवडणूक हुकुमशाही राजवटीच्या विरोधात लोकांना एकत्रित करण्याची निवडणूक आहे.