मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्री आणि क्रिकेटर्स यांचं नेहमीच एकमेकांशी घट्ट नातं असल्याचे समोर आले आहे. आजही अनेक बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटर्स आयुष्यभरासाठी एकमेकांशी नात जोडत असल्याचे दिसून येते. त्यातीलच एक नाव म्हणजे क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे. या दोघांच्या लव्हस्टोरीची केमिस्ट्री देखील खूप इंटरेस्टिंग आहे. पहिल्या भेटीतच झहीर सागरिकावर फिदा झाल्याचे आता समोर आले आहे.
झहीर सागरीकाची पहिली भेट बॉलिवूड अभिनेता आणि माजी क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा अंगद बेदी यांच्या माध्यमातून झाली होती. सागरिका अंगदची चांगली मैत्रीण होती, तर झहीर त्याला क्रिकेटमुळे ओळखत होता. अंगदच्या माध्यमातून झहीर आणि सागरिका पहिल्यांदा एकमेकांना भेटले. सागरिकाला पहिल्यांदा पाहिल्यावर झहीर तिच्या प्रेमात पडला. यानंतर दोघांनी डेटिंग सुरू केले आणि त्य्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली.
भारतीय क्रिकेटर युवराज सिंह आणि हेजलच्या लग्नात झहीर – सागरिका हातात हात घालून एकमेकांसोबत दिसल्याने त्यांच्या रिलेशनबाबत चर्चा सुरु झाली. परंतु दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्यांना विवाहासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे देखील बोलले जाते. सागरीकाच्या कुटुंबीयांनी झहीरसोबत लग्नासाठी लगेच होकार दिला होता परंतु जहिरच्या कुटुंबीयांनी अभिनेत्रीला घरची सून करून घेण्यासाठी सुरुवातीला विरोध दर्शवला होता. मात्र झहिरने त्यांची समजूत घातल्यानंतर त्याचे कुटुंबीय देखील लग्नासाठी राजी झाले.
झहीर खान भलेही क्रिकेटर असेल पण त्याची प्रपोज करण्याची शैली फिल्मी हिरोपेक्षा कमी नव्हती. आयपीएलमध्ये झहीर खानला सपोर्ट करण्यासाठी सागरिकाही मैदानावर दिसली होती. 2017 मध्ये अशाच एका आयपीएल मॅचमध्ये ती झहीरला सपोर्ट करण्यासाठी आली होती. दरम्यान, झहीर खानने सागरिकाला प्रपोज केले होते, जे पाहून अभिनेत्री खूपच आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर हे कपल गोव्यात सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. सागरिका आणि झहीर यांची गोव्यातच एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर दोघांनी 23 नोव्हेंबर 2017 रोजी कोर्ट मॅरेज केले.