टी-20 क्रिकेट जेव्हा उदयाला आले तेव्हा त्यात प्रत्येक चेंडूवर आक्रमक फलंदाजी करणे हीच अपेक्षा केली जात होती. आजही हे चित्र बदललेले नाही. पण क्रिकेटच्या या वेगवान प्रकारातही काही गोलंदाजांनी आपल्या अस्त्रांच्या जोरावर या प्रकारातील आक्रमक फलंदाजीला वेसण घालण्यात यश मिळवले. त्यातच भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान याने नक्कल बॉलचा (Knuckle ball) वापर करत आयपीएल व टी-20 स्पर्धेची सर्व समीकरणेच बदलून टाकली.
यंदा या सर्व गोष्टींची आठवण येण्याचे कारण म्हणजे यंदाच्या स्पर्धेत भुवनेश्वर कुमारसह अनेक गोलंदाज याच नक्कल बॉलचा वापर करत डावाच्या सुरुवातीला तसेच अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजांवर अंकुश ठेवताना दिसत आहेत. जसे पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकने दुसरा, वसीम अक्रमने टो-ब्रेकर, वकार युनूसने स्लो इनस्विंग यॉर्कर व कपिल देवने एकाच ग्रीपने टाकलेले इन व आऊट स्विंग चेंडू शोधले तसेच दक्षिण आफ्रिकेच्या काही गोलंदाजांनी या नक्कल बॉलवर हुकुमत निर्माण केली.
हा चेंडू नक्की कोणी शोधून काढला याबाबत अनेकांची मतमतांतरे आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीपटू गॅरी कर्स्टन हे भारतीय संघाचे 2011 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत प्रशिक्षक असताना त्यांनी झहीरकडून ही कला घोटवून घेतली व झहीरने तेव्हापासून या नक्कल बॉलच्या जोरावर जागतिक दर्जाच्या फलंदाजांवर वर्चस्व मिळवले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत केवळ भुवनेश्वरच नव्हे तर, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, टी. नटराजन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव यांच्यासह अन्य काही गोलंदाजही या नक्कल बॉलच्या जोरावर वर्चस्व गाजवत आहेत.
नक्कल बॉल (Knuckle ball) म्हणजे काय..?
गोलंदाजी करताना चेंडू रिलीज करतेवेळी त्यावरील पकड सैल केली जाते व केवळ अंगठा आणि अन्य दोन बोटांच्या ग्रीपमधून हा चेंडू त्याच शैलीने टाकला जातो. चेंडू वेगवान असेल या अपेक्षेने फलंदाज सज्ज होतो. मात्र, खेळपट्टीवर टप्पा पडल्यावर चेंडू स्लो होऊन फलंदाजाला चकवतो. त्यामुळे एकतर फलंदाज बाद तरी होतात किंवा मोठा फटका खेळू शकत नाहीत. टी-20 या प्रकारात तर सध्या याच चेंडूवर अनेक गोलंदाज यशस्वी होताना दिसत आहेत.