#AUSvIND : गोलंदाजच ठरणार निर्णायक – झहीर

कोहलीला लगाम घालणे आवश्‍यक - कमिन्स

मुंबई/सिडनी, दि. 20 – भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विद्यमान मालिकेमध्ये दोन्ही संघांतील गोलंदाजांची कामगिरीच निर्णायक ठरणार आहे. ऑस्ट्रेलियामधील खेळपट्‌टया पहिले दोन दिवस वेगवान तसेच नंतर फिरकी गोलंदाजीला अनुकूल असतात. त्यामुळे ज्या संघाकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा सक्षम मारा आहे, असा संघच या मालिकेत वर्चस्व गाजवू शकतो, असे मत निवृत्त भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने म्हटले आहे की, पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली भारतात परतणार असला, तरी तो ज्या सामन्यांत खेळणार आहे (एकदिवसीय आणि टी-20), त्या सामन्यांत त्याला लवकरात लवकर बाद करण्यावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना भर द्यावा लागेल.
चार कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि तितकेच टी-20 सामने खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून, त्यांची सर्वासत्रेही सुरु झाली आहेत. कोविड-19 च्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व ती काळजी घेत, निम्म्या प्रेक्षकसंख्येने मैदाने भरलेली असतील, असे आत्ता तरी चित्र आहे.

करोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाने बायो-सिक्‍युअर बबल्स आणि प्रत्यक्ष मैदानावरील क्रिकेट यात सर्वच क्रिकेटपटूंची घुसमट झाली आहे. मात्र, आता प्रदीर्घ काळानंतर मैदानावर खेळण्यास सर्वच जण उत्सुक आहेत. आरोग्यविषयक सर्व नियम पाळून नव्याने कामगिरीसाठी सज्ज होणे, ही कोणत्याच संघासाठी वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. भारतीय संघातील अनुभवी खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन संघातील नवोदित खेळाडू यांच्यातील संघर्ष खरोखरच रंजक ठरणार आहे.
– पॅट कमिन्स, वेगवान गोलंदाज

वर्ष 2011 च्या विश्‍वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या झहीर खानने म्हटले आहे की, एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी सामन्यांतही गोलंदाजांच्या कामगिरीवर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. कसोटीमध्ये प्रतिस्पर्धी संघाला दोन वेळा बाद करण्याची क्षमता दोन्ही संघांच्या गोलंदाजांमध्ये असल्याने मर्यादित षटकांच्या सामन्यांइतकीच चुरस कसोटीमध्येही पहायला मिळेल, याची मला खात्री आहे.

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची उपस्थिती यजमान संघाला बळ देणारी असल्याचे सांगून झहीर पुढे म्हणाला की, वर्ष 2018-19 च्या मालिकेत हे दोन्ही खेळाडू बंदीला सामोरे जात होते. त्यामुळे यावेळी भारताविरुद्ध खेळताना, ते जुना हिशेब चुकता करण्याच्या इराद्याने खेळण्याची शक्‍यता आहे.

रोहित नसला म्हणून काय झाले…?

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका येत्या 27 तारखेपासून सुरु होत असून या मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्माचा समावेश केलेला नाही. मात्र, तरिही विराट कोहलीचा संघ अधिक बलवान मानला जात आहे; कारण संघात रोहित नसला, तरी कोहली, के. एल. राहुल, शिखर धवन, मयंक आगरवालसारखे गुणी खेळाडू असल्याने भारला कमी लेखता येणार नाही, असे आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्‍सवेलने म्हटले आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरु शकतात, असेही मॅक्‍सवेल म्हणाला.

निवृत्त ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याच्या विचारांशी मिळते-जुळते विचार मांडत, झहीर खानने म्हटले आहे की, कोणता संघ मालिकेत वर्चस्व गाजवेल, याबाबतचे भाकित करणे सर्वस्वी अशक्‍य आहे. ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी मिळते-जुळते घेत खेळण्याची या भारतीय संघाला सवय झाली असली, तरी ऑस्ट्रेलियाच्या नव्या खेळाडूंपासूनही भारताने सावध रहाणे आवश्‍यक असल्याचे झहीरने सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.