वाघोली – दोन दिवसापूर्वी खासगी लॅबच्या करोना रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोणीकंद येथील तरुणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच याच तरुणाच्या संपर्कात आलेल्या 47 जणांच्या खासगी लॅबमध्ये केलेल्या करोना टेस्ट मध्ये दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
35 वर्षीय व 22 वर्षीय दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी पुणे शहरामध्ये पाठविण्यात येत आहे. दोघांच्याही संपर्कात आलेल्याची माहिती गोळा करून करोना टेस्ट करण्यात येणार आहे. पहिला करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांनी लोणीकंद गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
मेडिकल, आरओ प्लांट वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर आगामी काळातही रुग्ण वाढण्याची चिन्हे दिसत असल्याने आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.