रेडा – करोना या दुर्धर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व खबरदारीसाठी इंदापूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने अत्यंत चांगली नियोजन केले असून, अहोरात्र आरोग्य विभागाची टीम झटत आहे त्यांच्या कामाचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके यांनी दिली.
इंदापूर पंचायत समितीची मासिक मिटिंग पहिल्यांदाच “झूम ऍप’वर शुक्रवारी (दि. 24) पार पडली. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व पंचायत समितीच्या आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, पंचायत समितीचे सर्व सदस्य,तसेच सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. पंचायत समितीच्या शिक्षण विभाग आरोग्य विभाग तसेच बांधकाम विभाग, कृषी विभाग त्यांच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
सभापती पुष्पा रेडके म्हणाल्या की, करोनाला हरवण्यासाठी पंचायत समितीची सर्व यंत्रणा अहोरात्र काम करत असून, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी गावागावांतील नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. तरीदेखील अधिक काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, तसेच गाव पातळीवर आणखी मोठ्या प्रमाणात यासंदर्भात प्रभावी यंत्रणा राबवावी.
यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या खातेप्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला. गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे त्यांनी ऑनलाइन गटापासून मोठ्या गटापर्यंत सराव चाचणीचे आयोजन यशस्वी केले असल्याने शिक्षण विभागाचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. तर बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून ठप्प असणारी कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
इंदापूर तालुका ग्रामीण असतानादेखील “झूम ऍप’वर मासिक मीटिंग यशस्वीरीत्या पार पडते आहे, त्यामुळे प्रगत तंत्रज्ञानचा वापर योग्यरीतीने चालला आहे. करोना संदर्भात कोणत्याही विभागातील कर्मचारी, अधिकारी यांनी घोळ करता कामा नये. रोजची रोज गावाकडे असणारी माहिती पंचायत समितीकडे तात्काळ पुरवावी व खबरदारी घेण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर जागृत करावे.
– विजयकुमार परीट, गटविकास अधिकारी, इंदापूर