Lok Sabha Election 2024 : भाजपने मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी आणखी ३ उमेदवार जाहीर केले. त्यामुळे त्या पक्षाने राजकीय महासंग्रामात उतरवलेल्या उमेदवारांची संख्या ४०० पार झाली आहे.
.भाजपने मणिपूरमधील १ आणि राजस्थानमधील २ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. संबंधित तिन्ही मतदारसंघांमधील विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामध्ये केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांचाही समावेश आहे. ते मागील वेळी इनर मणिपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.
भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या ४०१ इतकी झाली आहे. केंद्रातील सत्तारूढ आघाडीचे (एनडीए) नेतृत्व करणाऱ्या भाजपने विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा संकल्प केला आहे. लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. त्यातील ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे एनडीएचे उद्दिष्ट आहे.
भाजपने स्वत:साठी ३७० जागा जिंकण्याचे टार्गेट निश्चित केले आहे. निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केलेल्या भाजपने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. त्या पक्षाचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या संख्येने अद्याप २०० चा आकडा ओलांडलेला नाही. भाजप नेमक्या किती जागा लढवणार आणि एनडीएतील मित्रपक्षांसाठी किती जागा सोडणार ते तूर्त स्पष्ट झालेले नाही.
त्यासाठी महाराष्ट्र हे राज्यही अपवाद ठरलेले नाही. महाराष्ट्रात सत्तेवर असणाऱ्या महायुतीमधील घटक एनडीएचेही सदस्य आहेत. मात्र, महायुतीमधील जागावाटपाविषयी अजून स्पष्टता आलेली नाही. तसे असले तरी भाजपने महाराष्ट्रातील २३ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रातही कॉंग्रेसपेक्षा जवळपास दुप्पट उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. कॉंग्रेसने आतापर्यंत महाराष्ट्रातील १२ उमेदवार जाहीर केले आहेत.