Lok Sabha Election 2024 । भाजपने नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचाही समावेश आहे.
माढा लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा भाजपकडे गेल्याने एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे.तर याच मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आता आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरूवात केली. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली गेल्याने माेहिते पाटील गट नाराज झाला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दाैरे सुरु केले आहेत.
मात्र यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील वाडेगाव या गावात प्रवेश करण्यापासून माेहिते पाटील यांना मराठा समाजाने राेखले. नेते मंडळींना गावात प्रवेश बंदी असल्याची भूमिका मराठा समाजातील युवकांनी ठामपणे मांडली. त्यामुळे माेहिते पाटील यांनी परतीचा मार्ग स्विकारला.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गावात येण्यास नेत्यांना बंदी घातली आहे. बंदी असताना तुम्ही गावात आलेच कसं असा जाब स्थानिक मराठा समाजातील युवकांनी माेहिते पाटील यांना विचारला. यावेळी युवकांनी एक मराठा लाख मराठा घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. दरम्यान धैर्यशील पाटील हे वडगाव येथे बैठक न घेता नियाेजित पुढील कार्यक्रमास रवाना झाले.