Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. लोकसभेच्या 543 जागांवर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, सातवा टप्पा 1 जूनला होणार आहे. तर 4 जूनला निकाल लागणार आहे. ( Lok Sabha Election 2024 )
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. यावेळी मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू , ज्ञानेश कुमार उपस्थित होते.
महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात होणार मतदान : । Lok Sabha Election 2024
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ,वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा – 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
कोणत्या टप्यात कधी निवडणुका होणार : Lok Sabha Election 2024
पहिला टप्पा -19 एप्रिल
दुसऱ्या टप्प्यात – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 7 मे
सातवा टप्पा – 1 जून
‘फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल’ :
राजीव कुमार म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात चुकीच्या माहितीला सामोरे जाणे अवघड आहे. चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी आम्ही काही उपाययोजना केल्या आहेत. आम्ही खोट्या बातम्यांचे खंडन करण्यात सक्रिय आहोत. फेक न्यूजचा प्रचार करणाऱ्यांवर सध्याच्या कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. कोणतीही बातमी पुढे पाठवण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्या. योग्य माहिती सुनिश्चित करण्यासाठी अधिकृत विधानावर अवलंबून रहा. सतर्क राहा आणि निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यात आम्हाला मदत करा. ( Lok Sabha Election 2024 )
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :
– ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढू नये. एका पक्षाने लावलेली पोस्टर्स दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढू नयेत.
– राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी इतर पक्षांच्या सभा किंवा मिरवणुकीत अडथळे निर्माण करणार नाहीत किंवा त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार नाही याची काळजी घ्यावी.
– नेते आपल्या समर्थकांना त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, परिसर भिंती इत्यादींवर झेंडे लावण्याची, बॅनर लावण्याची, माहिती पेस्ट करण्याची आणि घोषणा लिहिण्याची परवानगी देऊ शकत नाहीत.
– मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाईल.
– मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभांवर बंदी लागू होईल.
– मंदिर, मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये.
– विविध जाती आणि समुदायांमध्ये मतभेद किंवा द्वेष वाढवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतू नका. विद्वेष पसरवणारे वक्तव्य करू नका.
– कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करू नका.
देशात 97 कोटी मतदार :
आपल्या देशात 97.8 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
47.15 कोटी महिला मतदार :
राजीव कुमार म्हणाले की, 97 कोटी मतदारांपैकी 47.15 कोटी महिला मतदार आहेत. तर पुरुष मतदारांची संख्या 49.70 कोटी आहे. 19.74 कोटी युवा मतदार आहेत. ज्यांचे वय 20-29 वर्षांच्या दरम्यान आहे. निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
97 कोटी मतदार, 1.80 कोटी नवीन मतदार जोडले गेले :
2024 च्या लोकसभेत 97 कोटी लोक मतदान करू शकतील. 8 फेब्रुवारी रोजी, निवडणूक आयोगाने सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्ती 2024 अहवाल जारी केला होता. 18 ते 29 वयोगटातील 1.80 कोटी नवीन मतदार मतदार यादीत सामील झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांची संख्या 6 टक्क्यांनी वाढली आहे. निवडणूक आयोगाने सांगितले – लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे 96.88 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. याशिवाय, लिंग गुणोत्तर देखील 2023 मध्ये 940 वरून 2024 मध्ये 948 पर्यंत वाढले आहे.