Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर निवडणूक होणार आहेत. मध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि रामटेकचा समावेश आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदार संघात भाजपने दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.
असे असले तरी, रामटेक, भंडारा आणि गडचिरोलीमधील उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही. यातही रामटेक मतदार संघावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
याउलट, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर, चंद्रपूर आणि रामटेकची जागा काँग्रेस लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या तिन्ही जागांवरील उमेदवार ठरविताना काँग्रेसच्या नाकी नऊ आले आहे.
माजी मंत्री विलास मुत्तेमवार आणि नितीन राऊत यांच्यात उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यात भर घातली आहे ती माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि राजेंद्र मुळक यांनी. या दोन्ही नेत्यांनी सुद्धा रामटेकमधून आपल्या समर्थकांसाठी तिकीट मागितले आहे.
रामटेकच्या जागेवरून काँग्रेस नेत्यामध्ये किती तू तू मैं मैं होत आहे याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलाविलेल्या बैठकीत केवळ रामटेकच्या मुद्यावर तब्बल पाच तास चर्चा झाली. विलास मुत्तेमवार आपल्या समर्थकसाठी तिकीट मागत आहेत तर नितीन राऊत आपल्या मुलासाठी तिकीट मागत आहेत.
याशिवाय माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. चंद्रपूरमधून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आपल्या मुलीसाठी दिल्लीत तंबू गाडून बसले आहेत. तर, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर सुद्धा लढण्यास उत्सुक आहेत. त्या सुद्धा दिल्लीत येऊन थांबल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी निवडणूक : – Lok Sabha Election 2024
अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण 102 जागांवर मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. । Lok Sabha Election 2024