नागरिकांना सातच्या आत घरात यावेच लागणार
सुरक्षेच्या अटींसह सलून व्यवसाय सुरू राहणार
दुचाकीवर डबलसीट बसता येणार नाही
पुणे – राज्य सरकारने लागू केलेले दि.31 जुलैपर्यंतचे लॉकडाऊन राहणारच आहे; परंतु पुण्यासह पिंपरीत शुक्रवारपासून दि.13 जुलैच्या आधीप्रमाणे शिथिलता देण्यात आली आहे. दुकाने, आस्थापना आणि सर्व व्यवहार सुरू करता येणार असले, तरी नागरिकांना सातच्या आत घरात जावे लागणार आहे. सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
शाळा, महाविद्यालये, थिएटर्स, मॉल, उपहारगृहे, हॉटेल, स्पा, धार्मिक स्थळे, उद्याने बंदच राहणार. मात्र, सुरक्षेच्या अटींसह सलून सुरू राहणार आहेत, तर हॉटेल्सना पार्सल सेवा सुरू ठेवण्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. जॉगिंग, सायकलिंग, धावणे, चालणे याला मुभा देण्यात आली असली तरी ती रस्त्यावर नव्हे तर मोकळ्या मैदानात करण्याविषयी अट घालण्यात आली आहे. याशिवाय जिमला आणि बंद खोलीत (इनडोअर) असणाऱ्या क्रीडा प्रकारांना बंदी असेल. खासगी आस्थापनांना 15 टक्के मनुष्यबळात काम करता येणार आहे, तर दुकाने “पी-1 पी-2′ पद्धतीनेच सुरू राहणार आहेत. मंडईही ओट्यांच्या नंबरानुसार सम आणि विषम तारखेला सुरू ठेवता येणार आहेत.
मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी असेल याशिवाय अत्यावश्यक सोयीसाठी वाहन वापरता येईल; परंतु त्यामध्ये बसणाऱ्या व्यक्तीसंख्येवर निर्बंध असतील. टॅक्सी, कॅबसह चार चाकी वाहनांमध्ये केवळ वाहनचालकासह तीन व्यक्तींना परवानगी, तर रिक्षामध्येही तीन, दुचाकीवर केवळ एकच म्हणजे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीलाच परवानगी असेल डबलसीट बसवता येणार नाही. लग्नकार्यात नवरा-नवरीसह केवळ 20 जणांनाच उपस्थित राहता येणार.
खेड, हवेलीतील 41 गावे “लॉक’च
जिल्ह्यातील खेड, हवेली तालुक्यांतील एकूण 41 गावांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे या 41 गावांमध्ये महिनाअखेरपर्यंत लॉकडाऊन असेल. खेड तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण, आळंदी नगरपरिषद हद्दींसह 18 गावांमध्ये मंगळवार (दि. 28) तर हवेली तालुक्यातील 20 गावांमधील लॉकडाऊन शुक्रवार (दि. 31) पर्यंत वाढवण्यात आला आहे.
हे राहणार बंदच…
– शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण वर्ग, खासगी क्लासेस.
– सिनेमा हॉल, व्यायाम शाळा, तलाव, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे.
– सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम.
– स्पा, मॉल, हॉटेल आणि अन्य आदरातिथ्य करणाऱ्या सर्व सेवा
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, एसटी, पीएमपी
– प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियम
– प्रतिबंधित क्षेत्र संबंधित पोलीस ठाणी सील करतील.
– अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता या भागात कोणासही प्रवेश करता येणार नाही.
– महापालिकेची अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंधात क्षेत्रामध्ये प्रवेश करता येईल. त्याकरिता कोणत्याही पासची आवश्यकता नाही.
– अत्यावश्यक वस्तूंची दुकाने (किराणा दुकान, भाजीपाला, मेडिकल, दवाखाने, दूध, रेशन दुकाने) सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील.