वाघोली (प्रतिनिधी): पूर्व हवेली तालुक्यात दि. 23 रोजी रात्री अकराच्या सुमारास सुरुवात झालेल्या पावसाने हवेली तालुक्यातील शिरसवडी मुरकुटे नगर, वाडेबोल्हाई, गावडेवाडी, बिवरी, डोंगरगाव पिंपरीसांडस, आष्टापूर आदी भागात शेतीचे प्रचंड नुकसान केले असून रस्त्यांवरून पूरस्थिती चे पाणी व रस्ते खचून गेले आहेत. तर शेतामधील साचलेले पाण्यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पाच तास झालेल्या पावसाने पूर्व हवेली च्या भागातील प्रचंड नुकसानाची तीव्रता नागरिकांना येऊ लागली आहे. ताकदीने शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत करण्याचे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक माणिकराव गोते यांनी केले आहे.
दि. 23 च्या मध्यरात्रीपासून सुरुवात झालेल्या पावसा मुळे परिसरातील शेती छोटे-मोठे लघुउद्योग, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्या बरोबर सामान्य नागरिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.