रेडा – इंदापूर तालुक्याची आणि पुणे जिल्ह्याची हद्द सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीच्या पुलावर संपते. त्याठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस तपासणी नाक्यावर इंदापूर तालुक्यातील उपचारासाठी जाणारा रुग्ण अकलूजकडे तातडीचे जाण्याची गरज असताना जाणीवपूर्वक अडवले जातात.
त्यामुळे कित्येक रुग्णांना प्राणाला मुकावे लागले आहे. वेळेत उपचार घेण्यासाठी पोलीस यंत्रणेसमोर रडले तरीदेखील सोडले जात नाही. त्यामुळे किमान रुग्णांना वाचवण्यासाठी तरी अकलूज पोलिसांनी माणुसकी दाखवावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
इंदापूर तालुक्यातील व्यवसायाने डॉक्टर व पत्रकार असलेल्या एका व्यक्तीच्या सख्या वयोवृद्ध चुलत्याचे पडल्यामुळे खुब्याचे हाड मोडले. त्यांना अकलूज येथे उपचारासाठी नेत असता नीरा नदीच्या सराटी पुलावर रुग्णवाहिका आली. पोलिसांनी तासभर थांबवले. त्यामुळे त्या रुग्णाच्या लघवीच्या पिशवीतून रक्त गेले. पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्त द्यावे लागले.
यासंदर्भात डॉ. संदेश शहा यांनी पोलीस यंत्रणेला विनंती केली. उलट गुन्हा दाखल करण्याची भाषा पोलिसांनी केली. याचठिकाणी भोडणीतील अण्णासाहेब गोसावी यांनी आपल्या नातेवाइकाला उपचार अकलूजला मिळावेत म्हणून सोडण्यासाठी हात जोडून विनवणी केली. मात्र, सोलापूर ग्रामीण पोलिसांना माणुसकीचा पाझर फुटला नाही.
सराटीचा पूल मृत्यूचा सापळा
सराटी येथील पुलावर अत्यावश्यक असलेल्या रुग्णाला अकलूज येथील उपचारासाठी सोडले जात नसल्यामुळे काहीजणांना प्राणाला मुकावे लागले आहे. सराटीचा पूल लॉकडाऊनच्या काळात मृत्युचा सापळा बनल्याची नवी ओळख निर्माण झाली आहे.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासंदर्भात सोलापूर ग्रामीण पोलिसांना इमर्जन्सी पेशंट अकलूज येथे उपचारासाठी सोडण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.