खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

पारनेर तालुक्‍यातील गोरेगाव येथील घटना

नगर- विलास देवराम नरसाळे (वय- 48, रा.गोरेगाव, ता. पारनेर, जि. नगर) याने चिमाभाउ बळवंत नरसाळे याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी आरोपीस दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी तसेच पुरावा नष्ट केल्याबद्दल 3 वर्षे सक्तमजुरी व दंड 5 हजार रुपये व हा दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.

याबाबत माहीती अशी की, 13 ऑगस्ट 2015 रोजी चिमाभाउ बळवंत नरसाळे यांचेबरोबर असणाऱ्या शेतीच्या वादातुन पुतण्या आरोपी विलास देवराम नरसाळे याने चिमाभाउ नरसाळे हे दुपारी शेतामध्ये गेले असताना त्यांना कुऱ्हाडीच्या दांडक्‍याने मारहाण करून जखमी केले. परंतु उपचारासाठी दवाखान्यात घेवुन जात असताना रस्त्यामध्येच उपचार घेण्यापुर्वीच त्यांना मृत्यु झाला. घटनेची फिर्याद मयत चिमाभाउ नरसाळे यांचा नातु संपत अंबादास नरसाळे याने पारनेर पोलीस स्टेशनला दिली.

फिर्यादीवरून आरोपीस दि. 14 ऑगस्ट 2015 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर सदर घटनेचा संपुर्ण तपास त्यावेळेचे पोलीस निरीक्षक डी.बी.पारेकर यांनी करून आरोपीविरूध्द पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला सत्र न्यायालयामध्ये वर्ग होवुन खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एस.आर.जगताप यांचे समोर झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये 1 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार काढुन दिलेल्या पुराव्याबाबत 1 साक्षीदार, तसेच सदर खटल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डी.बी.पारेकर तसेच आरोपीने गुन्हा करतेवेळी घातलेल्या कपड्यावरील रक्ताच्या डागांबाबतचा न्यायवैद्यकिय अहवाल इत्यादी पुरावा महत्वाचा ठरला. सरकारी पक्षाने सादर केलेला पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.सरकारी पक्षाच्या वतीने अति. सरकारी अभियोक्ता अनिल सरोदे यांनी काम पाहिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.