वाईमध्ये कॉंग्रेसचा सवतासुभा

राष्ट्रवादीच्या व्यासपिठावर न जाता स्वतंत्र प्रचार

वाई –
सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

देशात व राज्यात भाजप सेना युती सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी गट तट व अंतर्गत वाद बाजूला ठेऊन कॉंग्रेसने मित्रपक्षांना हाताशी घेऊन महाआघाडीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. परंतु राज्यात जरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांची महाआघाडी दिसत असली तरी वाई तालुक्‍यातील कार्यकर्त्यांची अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आ. मकरंद पाटील व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी घेत गावोगावी सभा बैठका सुरू केल्या आहेत. तर स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कॉंग्रेसने देखील सर्वस्व पणाला लावून कंबर कसली आहे.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर न जाता उदयनराजेंचा स्वतंत्र प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ बुधवारी दुपारी तीन वाजता वाई येथील साठे मंगल कार्यालयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, सातारा जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब बागवान, गुरुदेव भरदाडे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव जयदीप शिंदे, युवा नेते विकास शिंदे, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदनाताई धायगुडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी मेळाव्यास वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर तालुक्‍यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.