प्रशासनाने फसवणूक केल्याचा महिला-बाल कल्याण समिती अध्यक्षांचा आरोप
पुणे – जम्बो कोविड सेंटरबाबत प्रशासनाने फसवणूक केल्याचा थेट आरोप आता सत्ताधारी भाजपमधील नगरसेविका आणि महिला-बालकल्याण ज्योत्स्ना एकबोटे यांनीच केला आहे. वेळ पडली तर याच्या विरोधात भूमिका घेऊ, असा इशाराही निवेदनाद्वारे त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरविषयी महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी आता उघडपणे बोलू लागले आहेत.
पुण्यातील रुग्ण संख्येला अटकाव करण्यासाठी आणि करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी शहरात नव्याने जम्बो कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरविषयी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लोकप्रतिनिधींनाही वेगवेगळी माहिती देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात सध्या तशा सुविधा नव्या कोविड केअर सेंटरमध्ये दिसत नाहीत, अशी नाराजी व्यक्त करीत एकबोटे यांनी तक्रारी मांडल्या आहेत.
नव्याने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सोयीसुविधा, अनुभवी डॉक्टर, नर्सेस आणि इतर आवश्यक मनुष्यबळ यांची कमतरता दिसून येत आहे.
वेळप्रसंगी प्रशासनाविरोधी भूमिका…
नेमके किती मृत्यू झाल्यानंतर आपले प्रशासन जागे होणार आहे? सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात या जम्बो कोविड केअर सेंटरच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरही तुम्हांला द्यावीच लागतील. अन्यथा लोकप्रतिनिधी म्हणून वेळप्रसंगी आम्ही प्रशासनाविरोधी भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.