शिरूर -शेतकऱ्यांच्या मालाची आवक, त्याच्या मालाला भेटलेला बाजारभाव, त्याच्या मालाचे योग्य वजन आणि आणि त्याला मिळणारी एकूण रक्कम एका क्लिकमध्ये शेतकऱ्याला त्याच्या अँड्रॉइड मोबाइलवर मिळणार असून यासाठी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मापाडी अँड्रॉइड ऍप सुरू केले असल्याची माहिती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकरराव जांभळकर यांनी दिली.
यामुळे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढील काळात शेतकरी व्यापारी यांच्यात पारदर्शकता आणण्याचा हा प्रयत्न असून डिजिटल ऍप करणारी राज्यातील दुसरी बाजार समिती म्हणून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डिजिटल ऍप सुरू केले आहे. यावेळी संचालक ऍड. वसंतराव कोरेकर, प्रवीण चोरडिया, बंडू जाधव, सचिव अनिल ढोकले उपस्थित होते. या ऍपचा वापर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व बाजारांत करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना बाजार विषयक सर्व माहिती घर बसल्या त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. तसेच शेतमालाचे वजन अचूक होऊन त्याची माहिती लगेच त्यांना कळणार असून कृषी विषयक सर्व सल्ला घरबसल्या मिळणार आहे. ऍप बनवण्यासाठी संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले आहे.
-शंकर जांभळकर, सभापती शिरूर बाजार समिती