बिबट्याच्या दर्शनाने भिगवणकरांची पाचावर धारण

भिगवण (वार्ताहर) – गेले काही आठवडे भिगवण लगतच्या करमाळा व कर्जत तालुक्‍यात धुमाकूळ घातला आहे. सध्या बिबट्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याचे भय अद्याप कायम असतानाच इंदापूर तालुक्‍यातील भिगवण येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने भिगवणकरांची पाचावर धारण बसली आहे.

करमाळा तालुक्‍यात बिबट्याने धुडगूस घातल्यामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत भिगवण परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
भिगवणमधील शेतकरी पोपटराव जगताप यांच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम सुरू असताना दोन बिबटे दिसले. त्यामुळे अनेक नागरिकांना बिबट्या दिसल्याने भिगवण परिसरात शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असतानादेखील वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या परिसरात बिबट्या दिसल्याने ऊस तोडणी आणि शेतीच्या कामांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. परिसरामध्ये बिबट्याची पिल्ले दिसल्याची चर्चा भिगवण परिसरात होती. मात्र त्यावर कोणाचाच विश्‍वास बसत नव्हता. मात्र आता अनेक प्रत्यक्षदर्शींनी बिबट्याचे दर्शन घेतल्याने घटनेची खात्री झाली आहे.

भिगवण येथील घटनेची चौकशी करून तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना केली जाईल. त्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. विनाकारण बाहेर पडू नये, रात्री शेतात जावू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये.
– वनअधिकारी राहुल काळे

भिगवण परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी, शेतात काम करण्यासाठी एकटे बाहेर पडू नये. मोठ्या आवाजाची साधने बाळगत काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.
– जीवन माने, पोलीस निरीक्षक भिगवण

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.