वाघोली – हवेली तालुक्यातील 89 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. 8) जाहीर झाली. वाघोलीचे पुढील सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव झाले आहे, तसेच वाघोलीचा महापालिकेत समावेश होणार असल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
वाघोलीसह केसनंद, फुलगाव, मांजरी खुर्द ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव झाले आहे. हवेली तालुक्यातील 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2025 मधील 89 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली.
यामध्ये वाघोली ग्रामपंचायतीच्या चालू पंचवार्षिक कार्यकारी मंडळाची मुदत जानेवारी 2023 मध्ये संपत आहे. वाघोलीचीदेखील आरक्षण सोडत झाली. वाघोलीचे पुढील सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव झाले आहे. लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीमध्ये सरपंचपदाचे आरक्षण-
सर्वसाधारण – वाघोली, केसनंद, मांजरीखुर्द, शिरसवडी, वडगाव शिंदे, सांगवी सांडस, शिंदेवाडी, न्हावी सांडस, फुलगाव. सर्वसाधारण महिला- वढू खुर्द, बिवरी, वाडेबोल्हाई, पिंपरीसांडस, भावडी,
ओबीसी- कोलवडी-साष्टे, हिंगणगाव, ओबीसी महिला- लोणीकंद, बुर्केगाव, अष्टापूर, पेरणे, अनुसूचित जाती- आव्हाळवाडी, अनुसूचित जाती महिला- बकोरी, तुळापूर, डोंगरगाव.
पुढील निवडणुक झाली असती चुरशीची-
वाघोलीचा महापालिकेत समावेश होण्यासाठी शासन दरबारी जोरदार हालचाली चालू झाल्या आहेत. दोन महिन्यामध्ये वाघोलीचा महापालिकेत समावेश होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह आहे. महापालिका समावेशाची कार्यवाही झाली नसती तर पुढील सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुक चुरशीची झाली असती.