सातारा – सज्जनगडाच्या परिसरात आढळलेल्या बिबट्याच्या दीड महिन्यांच्या बछड्याची त्याच्या आईबरोबर भेट घडवून आणण्यात सातारा वन विभागाचे प्रयत्न अखेर यशस्वी ठरले आहेत. बिबट्याची मादी पिल्लाला घेऊन मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता सुरक्षित अधिवासात निघून गेली.
सज्जनगड परिसरातील रामघळ येथे काल दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजता एका पायवाटेजवळ बिबट्याचा दीड महिन्यांचा बछडा आढळून आल्याचे वन विभागाला समजले. साताऱ्याचे वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना दीड महिने वयाचा नर जातीचा बिबट्याचा बछडा आढळून आला. या बछड्यास त्याच ठिकाणी आईसोबत भेट घडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना वन विभागाने तात्काळ सुरू केल्या.
संबंधित ठिकाणी तीन कॅमेरे ट्रॅप बसवण्यात आले. सायंकाळी सव्वाचार ते रात्री साडेनऊपर्यंत बिबट्याचा बछडा आणि मादी बिबट्या आईची पुनर्भेट होण्याकरता सातारा वन विभागाचा प्रयत्न सुरू होता. रात्री साडेनऊच्या दरम्यान हा बिबट्याचा बछडा आणि आई एकत्र आले. आईने परिस्थितीचा अंदाज घेत खुराड्यात ठेवण्यात आलेल्या बछड्याला घेतले. आणि ती सुरक्षित अधिवासात निघून गेली.
या पुनर्भेटीसाठी पुणे बावधन येथील रेस्क्यू टीम आणि सह्याद्री प्रोटेक्टर्स फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. वन विभागाच्या कोणत्याही कार्यक्षेत्रात कोणताही वन्य प्राणी अथवा त्याची पिले दिसल्यास सातारा वन विभाग कार्यालयाच्या 1926 या हेल्पलाइनवर तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले.
हा बिबट्याचा बछडा आणि आई एकत्र येण्याकरिता प्रभारी उपवनसंरक्षक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, परळीचे वनपाल अरुण सोळंकी, परळी वनरक्षक साधना राठोड, ठोसेघर वन रक्षक अशोक मलप, वनरक्षक मारुती माने, वन कर्मचारी संतोष दळवी व सज्जनगड, परळी परिसरातील ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.