नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणार
सासवड – पुरंदर तालुक्यात सध्या लम्पी रोगाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे पंचायत समिती पुरंदरच्या पशुसंवर्धन विभागाने यावर्षी बैल पोळा साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे पत्र सरपंच, पोलीस पाटील ,तलाठी यांना देण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातही या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे लम्पी चर्म रोगाचे नियंत्रण व प्रतिबंधासाठी गुरे/ म्हशीचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजीत करणे आदींसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.
ही बाब विचारात घेता बैलपोळा सणानिमित्त गावातील बैल मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन त्यांची मिरणूक काढली जाते; परंतु सध्याच्या परिस्थितीत असे झाल्यास लंम्पी चर्मरोग प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल, त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रसार रोखण्यासाठी बैलपोळा सणानिमित्त गावातील बैल एकत्र आणण्यास बंदी घालण्यात येत आहे. तरी ग्रामपंचायतीनी नोटीस बोर्ड, फलेक्स किंवा दवंडी देवून सर्व पशुपालकांना याबाबत अवगत करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मधील कलम 4 नुसार पशुपालक इतर व्यक्तींना रोग प्रादुर्भावाबाबत काळजी घेणे बंधनकारक राहील. तसेच अधिनियमातील बाबींचे उल्लंघन झाल्यास कलम 39, 32 व 33 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यासाठी पोलीस पाटील यांनी पशुसंवर्धन विभागास सहाय्य करावे, असे आदेशात म्हटले आहे.