प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -“माणसाची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी सध्याची शिक्षणप्रणाली अनुकूल नाही. जास्तीत जास्त कृतीभिमुख शिक्षण देण्याची काळाची गरज आहे. ज्या गोष्टींचा आपण वापर करणे बंद करतो. कालांतराने त्या गोष्टी विसरून जातो. त्या मेंदूच्या पटलावरून नाहीशा होतात. त्यामुळे अनुकूल असलेल्या सर्व गोष्टींची कृती आपण दैनंदिन आयुष्यात करणे गरजेचे आहे, असे मत बिझनेस कोच अविनाश देशमुख यांनी व्यक्त केले. त्यांनी यावेळी वेगेवेगळ्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मेंदूची कार्यक्षमता कशी वाढवू शकतो, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पुणे बार असोसिएशनतर्फे (पीबीए) देशमुख यांचे “ब्रेन जिम’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी मेंदूच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी व एकाच वेळेस मल्टीटास्किंग करण्याचे तंत्रज्ञान कसे अवगत करावे, याबाबत सांगितले.
याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ऍड. अमोल शितोळे, सचिव ऍड. सुरेखा भोसल,े खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे, कार्यकारिणी सदस्य-ऍड. काजल कवडे, ऍड. अर्चिता जोशी, ऍड. मजहर मुजावर, ऍड. अमोल भोरडे, ऍड. अजय नवले, ऍड. अमोल दुरकर, ऍड. तेजस दंडगव्हाळ, ऍड. कुणाल अहिर, ऍड. रितेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन असोसिएशनच्या हिशेब तपासणीस ऍड. शिल्पा कदम यांनी केले. तर, कार्यकारिणी सदस्य ऍड. सई देशमुख यांनी आभार मानले.
वकील मंडळी सतत धावपळीत असतात. कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतात. वकिली व्यवसायात बौद्धिक कसरत मोठ्या प्रमाणावर होत असते. अशा वेळेस त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ रहावे. दैनंदिन कामकाज त्यांना सोपे जावे, यासाठी अविनाश देशमुख यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सदुपयोग होणार आहे.
– ऍड. पांडुरंग थोरवे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन