नवी दिल्ली – संरक्षण सर्वोत्कृष्टतेसाठी नवोन्मेश कार्यक्रमात नवी दिल्लीत ‘डिफेन्स इंडिया स्टार्ट अप चॅलेंज-4’ चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज प्रारंभ केला. जवानांसाठी आणि ‘आयडीईएक्स फॉर फौजी’ आणि उत्पादन व्यवस्थापन दृष्टीकोन मार्गदर्शक तत्त्वेही यावेळी जारी करण्यात आली.
भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या नवोन्मेशाला चालना देण्यासाठी ‘आयडीईएक्स फॉर फौजी’ हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. सीमेवर आणि इतर ठिकाणी 13 लाख कर्मचारी सेवेत असून अतिशय प्रतिकूल हवामानात काम करत संबंधित साधनांचा उपयोग करतात.
यापैकी अनेकांकडे यामध्ये सुधारणेसाठी नाविन्यपूर्ण कल्पना असतील. मात्र त्यांना चालना देण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे जवानांसाठी हे नवे दालन खुले होणार असून नवोन्मेशाचा भाग होऊन त्याची दखल घेण्यात येऊन त्यासाठी त्यांना गौरवण्यात येणार आहे.
आपली संरक्षण प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी खाजगी क्षेत्राचा सहभागही महत्वाचा आहे. यासाठी खाजगी क्षेत्रासमवेत भागीदारी, तंत्रज्ञान हस्तांतरण, ऑटोमॅटिक मार्गाने 74 टक्के थेट परकीय गुंतवणूक आणि आयातीसाठी प्रतिबंधित 101 बाबींची नुकतीच जारी केलेली सूची यासारखी पावले उचलण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
डिफेन्स इंडिया स्टार्ट अप चॅलेंज -4 अंतर्गत सशस्त्र दल,ओएफबी आणि डीपीएसयु द्वारे 11 चॅलेंज संभाव्य स्टार्ट अप,नवोन्मेशी, एमएसएमई यासाठी खुली करण्यात आली असून त्यांच्याकडून संरक्षण क्षेत्रात उपयोगी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत नाविन्यपूर्ण कल्पना अपेक्षित आहेत.