वॉशिंग्टन – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा अमेरिकेत मेरिलॅन्ड येथे उभारला जाणार असून, या पुतळ्याचे अनावरण 14 ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे. “स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ असे नाव असलेल्या या पुतळ्याची उंची 19 फूट इतकी असणार आहे.
वॉशिंग्टनच्या दक्षिणेला 35 किलोमीटर अंतरावर मेरिलॅन्डमधील अक्कोकीक शहरामध्ये 13 एकर परिसरामध्ये आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर उभारले जात असून, या सेंटरमध्येच साकारण्यात येणाऱ्या आंबेडकरांच्या स्मारकामध्येच हा पुतळा उभारला जाणार आहे.
भारताबाहेर उभारण्यात येणाऱ्या आंबेडकरांच्या पुतळ्यांपैकी हा सर्वात जास्त उंचीचा पुतळा असणार आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. आंबेडकरांनी आपल्या तीन लाख अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याच “धम्मचक्र परिवर्तन दिना’चे औचित्य साधून मेरिलॅन्डमधील पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुतळा अनावरण सोहळ्याला विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांनी हा पुतळा घडवला आहे. राम सुतार यांनीच नर्मदा नदीच्या पात्रातील बेटावरील “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ नावाने ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही घडवला आहे.